पाचोर्‍यातील ग्रामसेवकाला 16 लाखांचा गंडा : जळगावातील फौजदारासह पाच आरोपींना बेड्या

रक्कम तिप्पट करण्याच्या बहाण्याने फसवले : आरोपीच पोलिस निघाल्याने खळबळ


Gramsevak in Pachorya was robbed of Rs 16 lakhs : Five accused including a police officer from Jalgaon were arrested जळगाव  (17 डिसेंबर 2024) :  पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवकाला रक्कम तिप्पट करण्याच्या बहाण्याने 16 लाखांचा गंडा घालण्यात आला. ग्रामसेवकाने फसवणूक झाल्याचे कळताच पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली व यंत्रणेने तपासचक्रे फिरवताच याप्रकरणात पोलिसच मास्टरमाईंड निघाला. जळगाव मुख्यालयातील फौजदारासह जळगाव मुख्यालयातील दोन पोलिसांना अन्य दोन संशयीत मिळून पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिस वर्तुळातील अधिकार्‍यांनीच लुटीसह फसवणुकीचा प्रकार केल्याने जळगाव पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपींमध्ये ग्रेडेड फौजदार प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके आणि पोलीस कर्मचारी दिनेश भोई, सचिन धुमाळ, नीलेश अहिरे यांचा समावेश आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
खडकदेवळा, ता.पाचोरा ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून विकास मच्छींद्र पाटील (47, शांतीनगर, पाचोरा) कार्यरत आहेत. जळगावात 2023 मध्ये झालेल्या सामन्यात त्यांची ओळख सचिन धूमाळ यांच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर ते देव दर्शनासाठी गेल्यानंतर धूमाळ याने आपल्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार पाटील यांनी ग.स.पतपेढीतून 14 लाखांचे कर्ज काढले व दोन लाख रुपये जमवत 16 लाख रुपये घेवून 16 रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव गाठले.

पोलिसांनीच लूटली रक्कम
सोमवारी सायंकाळी 7.315 वाजता सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर रक्कम तिप्पट करून देणार्‍या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेल्यानंतर एकाने बॅग घेतली व तो रेल्वे स्थानकाचा जीना चढून जात असताना त्याच्या पाठीमागून दोघे चालत असतानाच पोलिस गणवेशात तिघे आले व त्यांनी पैशांच्या बॅगेसह निलेश अहिरे नामक व्यक्तीला ताब्यात घेतले त्यामुळे धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की, आता पोलिस पैसे घेऊन गेले आहेत. आपल्याला काहीच करता येणार नाही. परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सगळाच भांडाफोड झाला.

पोलिसच निघाले आरोपी
पोलीस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते. ग्रेडेडे पीएसआय प्रकाश मेढे हे मुख्यालयात कार्यरत असून त्यांनी दिनेश भोई यांना सोबत घेत त्यानेच पैसे लुबाडण्याचा डाव आखला. ग्रामसेवक पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रेडेड पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ, नीलेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे.

पोलिस कर्मचारी मास्टर माईंड : 16 लाख रुपये जप्त
फसवणुकीच्या गुन्ह्यात मास्टर माईंड हा पोलिस कर्मचारी होता. गुन्हा दाखल करून पाचही संशयतांना अटक करण्यात आली असून सोळा लाख रुपये देखील जप्त करण्यात आल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले.


कॉपी करू नका.