सरपंच हत्येच्या रोषानंतर मुंडे भावंडांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट ! ; अजित पवारांना मिळणार जवाबदारी ?
नाशिक (3 जानेवारी 2025) : बीडचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनीच केल्यानंतर आता स्वाभाविकपणे मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अख्ख्या महाराष्ट्रात बीडमधील सरपंच हत्येचे प्रकरण गाजत असताना आता सरकारविरोधातही रोष वाढू लागल्याने मुंडे भावंनांडा पालकमंत्रीपद मिळणार नसल्याचे संकेत आहेत. अजित पवारांनी पालकत्व स्वीकारण्याबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे.
फडणवीस व अजित पवारांत झाली चर्चा
बीडच्या पालक मंत्रीपदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. या चर्चेत बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे किंवा त्यांच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडे यांना न देण्यावर मतैक्य झाल्याची माहिती आहे. विशेषतः बीडमध्ये घडणार्या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतः अजित पवार या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारतील, असा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे.










