शिक्षकांचे शिबिर सुटताच मधमाशांचा हल्ला : 9 जण जखमी


न्यूज नेटवर्क । जळगाव (8 मार्च 2025) : शिक्षकांचे शिबीर सुटल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक महाविद्यालयातून बाहेर पडताच अचानक एका झाडावरील मधमाशींचे मोहोळ उठले आणि त्यांनी हल्ला चढविला. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी पळापळ झाली. दुपारी तीन वाजेनंतर शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयाच्या गेटजवळ ही घटना घडली.

जळगाव तालुक्यातील शिक्षकांचे शिबीर (प्रशिक्षण) रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केले होते. हे शिबीर आटोपल्यानंतर शिक्षकांसह काही विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर जात होते. अचानक एका झाडावरील मधमाशींचे मोहोळ उठले आणि येणार्‍या या शिक्षक कर्मचार्‍यांवर त्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी काही जण पुन्हा महाविद्यालयाकडे पळाले.हा प्रकार न कळलेले काही जण गेटबाहेर पडताच ते मधमाशींच्या हल्ल्यात जखमी झाले.

कबाल रमजान खान, सिध्देश्वर हेमराज तायडे (23), सुरक्षा रक्षक युवराज विश्वनाथ तायडे (23), यशश्री राजेंद्र गांगुर्डे (19), शेख सर (45), सय्यद अकलाफ मुश्ताक अली (54), आसीमखान मंजूरजखान (40), मसुद अहेमद शेख मन्सुर (38), किशोर गुलाबराव पाटील (50, रा. पिंप्राळा) या शिक्षक विद्यार्थ्यांचा जखमींमध्ये समावेश आहे. सर्व जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !