वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून दहा पर्यटकांचा मृत्यू
Ten tourists die after a boat capsizes in the Yamuna River in Vrindavan. मथुरा (10 एप्रिल 2026) : मथुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून तब्बल 30 पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्टीमर यमुना नदीत उलटल्याने तब्बल दहा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. सर्व पर्यटक पंजाबहून आल्याचे सांगण्यात आले.
दुपारच्या सुमारास अपघात : लाईफ जॅकेटही नाही
जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास श्री बांके बिहार मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केसी घाटावर झाला. बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कर दाखल झाले आहे.

पन्नास स्थानिक डायव्हर्सदेखील शोधकार्यात गुंतले आहेत. जखमींना रामकृष्ण मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. गाझियाबादहून एनडीआरएफचे एक पथकही वृंदावनमध्ये दाखल झाले आहे.
12 जणांना वाचवण्यात यश
दोन स्टीमरमधून पर्यटक प्रवास करत होते. त्यापैकी एक स्टीमर उलटली, ज्यात 25 ते 27 लोक होते. दहा जणांचा मृत्यू झाला. 12 जणांना सुखरूप वाचवण्यात आले. तीन ते पाच जण अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथके शोधकार्य सुरू ठेवत आहेत.
पर्यटक मनोहर लाल म्हणाले, आम्ही सर्व पंजाबमधील लुधियाना, हिसार आणि मुक्तेश्वरचे आहोत. जोरदार वारे वाहत होते. यमुना नदीच्या मधोमध, जोरदार वार्यामुळे स्टीमर अचानक हेलकावे घेऊ लागली. तिचा वेगही वाढला. त्यानंतर स्टीमर एका तरंगत्या पुलाला धडकली आणि उलटली.


