पाचोरा पोलिसांची कामगिरी : तीन तासात दोन गुन्ह्यांची उकल
Pachora Police Achievement : Two Crimes Solved in Three Hours पाचोरा (17 एप्रिल 2026) : पाचोरा पोलिसांनी अवघ्या तीन तासात चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या. रिहान हमीश शहा (22, रा.हनुमाननगर, पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
गुरुवार, 16 एप्रिल रोजी नय्युम जहांगीर देशमुख (रा. आक्सानगर, जारगाव, ता. पाचोरा) यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोदामातून 94 हजार 500 रुपये किंमतीचे गोदरेज कंपनीचे तीन ए.सी. अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. ही घटना 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान घडली होती. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रिहान हमीश शहा (22, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले 94 हजार 500 रुपये किंमतीचे तीन ए.सी. जप्त करण्यात आले.
याचबरोबर 15 एप्रिल रोजी दाखल झालेल्या आणखी एका गुन्ह्यातील सुमारे 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोतही पोलिसांनी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करून संपूर्ण मुद्देमाल अवघ्या तीन तासांत परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विलास पाटील, हवालदार वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, संदीप राजपूत, गणेश कुंवर आदींच्या पथकाने केली.


