हेल्मेट घाला, सुरक्षित रहा : भुसावळात हेल्मेट वाटपप्रसंगी पोलिसांनी दिला वाहनधारकांना संदेश
वाहतूक नियम पाळणार्या वाहनधारकांचे गुलाबपुष्पाने स्वागत : रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता
भुसावळ (9 जून 2026) : महामार्गावर रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून रस्ते अपघातामध्ये दररोज सरासरी 43 जणांचे मृत्यू होतात व त्यात दुचाकीस्वारांचा अधिक समावेश असून हेल्मेट परिधान न करणे हे खरे मृत्यूचे कारण आहे त्यामुळे हेल्मेट घाला व नियमांचे पालन करून सुरक्षित रहा, असा संदेश भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी येथे दिला. महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिक व वाहनधारकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी नाहाटा चौफुलीवर वाहनधारकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बारबोले बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग 53 वरील चिखली-तरसोद प्रकल्पाचे कन्सेशनायर एनएक्सटी इन्फ्रा सीटी फायवे प्रा.लि.यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
नियम पाळणार्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत
रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोमवारी सायंकाळी भुसावळ शहरातील नाहाटा चौकात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान दुचाकी चालवणार्या महिलांना सुरक्षिततेसाठी मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणार्या शिस्तप्रिय वाहनधारकांचे पोलीस प्रशासनातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
नियम पाळल्यास अपघाताना आळा
उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले म्हणाले की, वाहतूक नियमांचे वाहनधारकांनी काटेकोर पालन केल्यास निश्चितपणे अपघाताना आळत्त बसेल. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरण्याचे आणि सुरक्षित वाहन चालनाची सवय अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविण्याची गरज अधोरेखित करत वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
अपघात रोखण्यासाठी जनजागृती
उपव्यवस्थापक पायल बुधवानी म्हणाल्या की, रस्ता वापरणार्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही कंपनीची प्राथमिकता आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी भविष्यातही अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील.

यावेळी सुरक्षा अधिकारी शेख शोएब म्हणाले, हेल्मेट ही केवळ कायदेशीर अट नसून जीवन रक्षणाचे प्रभावी साधन आहे. अपघातांमध्ये डोक्याला होणार्या गंभीर दुखापती दर्जेदार हेल्मेटच्या नियमित वापरामुळे मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
यांची होती उपस्थिती
उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक काळे, एनएक्सटी इन्फ्रा सीटी फायवे प्रा.लि.च्या उपव्यवस्थापक पायल बुधवानी, सुरक्षा अधिकारी शेख शोएब आणि कंपनीचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.



