दीपनगरात धडकला वंचित बहुजन आघाडीचा भव्य रोजगार हक्क मोर्चा
स्थानिक प्रकल्पग्रस्त व प्रदूषणग्रस्त बेरोजगार युवकांच्या रोजगार हक्कासाठी वंचितने दिला निर्णायक लढ्याचा इशारा
Vanchit Bahujan Aghadi’s grand ‘Right to Employment’ march reaches Deepnagar भुसावळ (9 जून 2026) : भुसावळातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी भव्य दीपनगर रोजगार हक्क मोर्चा व दुचाकी रॅली काढण्यात आली. भुसावळातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेल्या मोर्चाने दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसर गाठत स्थानिक युवक, प्रकल्पग्रस्त आणि प्रदूषणग्रस्त गावांच्या रोजगार हक्काचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविला.
युवकांना रोजगाराच्या संधींपासून ठेवले वंचित
दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे साकरी, जाडगाव, मन्यारखेडा, पिंप्रीसेकम, निंभोरा, फुलगाव, वरणगाव, अंजनसोंडे, तपतकठोरा, वेल्हाळे, कठोरा खुर्द, दर्यापूर, टाकळी, हतनूर, दीपनगर, फेकरी, खडका, कंडारी, गहूखेडा, रायपूर, रणगाव, तासखेडा, उदळी, गाते आणि थोरगव्हाण या गावांतील नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा फटका बसत आहे. शेती, आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतानाही स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवण्यात आल्याची तीव्र भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून स्थानिक युवक रोजगाराच्या मागणीसाठी पाठपुरावा करत असताना त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.प्रदूषणाचा भार स्थानिकांनी सहन करायचा, जमीन स्थानिकांनी द्यायची, आरोग्याचे प्रश्न स्थानिकांनी भोगायचे; मात्र रोजगाराच्या संधी बाहेरील लोकांना देण्याची प्रवृत्ती ही अन्यायकारक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
तर तीव्र जनआंदोलनाचा इशारा
यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला. आमच्या आयुष्यात राख कालवून सत्ताधारी, कंत्राटदार, ठेकेदार, हफ्तेदार आणि वशिलेदार यांचे भले होत असेल, तर हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. रोजगार हा आमचा घटनात्मक आणि नैतिक हक्क आहे,अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला आघाडीच्या पल्लवी गुरचळ यांनी केले. याप्रसंगी सुनीता पालवे, प्रमिला बोदडे, ईश्वर लहासे, संगीत खरे, रुपेश साळुंखे, नवनीत गायकवाड, गणेश इंगळे, प्रीती तायडे, नीता सोनवने, अरुणा दाभाडे, साधना वानखेडे, शाहरूख कुरेशी, निलेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, महिला, शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिक तसेच विविध गावांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.


