अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे
मुंबई (रविवार, 26 जुलै 2026) : आज कोणतीही निवडणूक नाही, पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे, यात आपण सर्वजण जात-पात धर्म विसरून होय मी देशभक्त आहे या एकच भावनेने एकत्र आलात. एका झुरळाने हुकूमशाहाला हरवले असल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मुंबईत रविवारी झालेल्या जल्लोष सभेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या सर्व 21 विद्यार्थ्यांचे नाव घेत त्यांना आदरांजली वाहिली.
आता तरी देशासाठी काम करा
उद्धव ठाकरे म्हणाले, मला मोदीजी यांना सांगायचे आहे की आता तरी देशाचे काम करावे. तुमचे नेते पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणसाठी पुढे आले. आपले खड्डा मंत्री, नाही, रस्ता मंत्री , ते इथेनोलवर बोलत आहेत. मोदींना सांगायचे आहे की लाडक्या धर्मेंद्रला काढताना किती यातना झाल्या, त्यापेक्षा किती तरी जास्त यातना, या मुलांनी जीव दिला, त्यांच्या पालकांना किती यातना झाल्या हे तुम्हाला कळणार नाही.
अंधभक्तांकडून मुलांना धमक्या
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका गेल्या खड्यात, कारण आता मोदींनी पाहिले आहे की मत चोरता येतात, लोकं चोरता येत नाही. मन चोरता येत नाही. ही मन आता पेटलेली आहेत, ही ठिणगी पेटलेली ठेवणे हे आपले काम आहे. हे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ शेयर करा आणि त्यांना खरे हिंदुत्व शिकवा.
आंदोलनाला यश : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, आजचा दिवस हा काही भाषण करण्याचा नव्हे. तुम्ही जे आंदोलन पेटवले होते, त्याला जे यश आले, त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. या देशातले जेनझी या सरकारच्या ‘जेनझ्या’ कशा उपटताट हे या आंदोलनातून कळले. आज मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे, नीटच्या परीक्षा, आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व 21 विद्यार्थ्यांची नावे बोलून दाखवली आणि त्यांना आदरांजली वाहिली.
राज ठाकरेंनी मानले महाराष्ट्राच्या पोलिसांचे आभार
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या पोलिसांचे मी आभार मानतो. त्यांनी दाखवून दिले की, दिल्लीतले पोलिस आणि महाराष्ट्राचे पोलिस कसे आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी खरोखर चांगले काम केले आणि सहकार्य केले. तुम्ही केलेल्या आंदोलनाची इतिहास दखल घेतल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित केली. सभेनंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम् हे गाणे लावले गेले. यावेळी सर्वांनी तिरंगा फडकवत गाण्याचा आस्वाद घेत विजयाचा जल्लोष साजरा केला.



