55 वर्षात पंधरांव्यादा गिरणा धरणाने गाठली शंभरी : दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


चाळीसगाव (गुरुवार, 30 जुलै 2026) : राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातही 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. चाळीसगाव परिसरातील गिरणा धरणाच्या लाभ क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास 97 टक्के जलसाठा असल्याने तब्बल 15 व्यांदा हे धरण भरणार असल्याने गिरणा काठवासी सुखावले आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

15 व्यांदा गाठली शंभरी
गत 55 वर्षात 15 वेळा धरणाने शंभरी गाठली आहे. 2023 मध्ये धरण कसेबसे 56 टक्के भरले होते. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 21 हजार 500 दलघफू असून मृतसाठा तीन हजार दलघफू इतका आहे. गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यास सिंचनासाठी तीन तर पेयजलासाठी चार आवर्तने दिली जातात. गेल्यावर्षी मात्र परतीच्या पावसाने भरभरून माप दिल्याने धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने दिली गेली. याचा थेट फायदा गिरणा खोर्‍यातील बागायती क्षेत्रालाही झाला. गेल्यावर्षी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पेयजलासाठी चार आवर्तने देण्यात आली आहे. चौथे आणि शेवटचे आवर्तन 16 रोजी सोडले गेले.

जिल्ह्यातील 75 टक्के लोकसंख्येची भागते तहान
गिरणा धरणातून चाळीसगावसह मालेगाव शहर, नांदगाव व 56 खेडी यासोबतच 127 पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडले जाते. चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतीची चाकेही गिरणा धरणाच्या पाण्यावरच फिरतात. जिल्ह्याच्या 75 टक्के लोकसंख्येची तहानही गिरणा धरणच भागवते. पेयजलासाठी गिरणा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यापर्यंत प्रवास करते.

मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सध्या 10,000 ते 15,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे गिरणा नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी आपले पशुधन, शेतीपंप, कृषी साहित्य, मौल्यवान वस्तू व इतर सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच नदीपात्रात अथवा नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, नदीपात्रात विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे लक्षात घेता संबंधित विभागांनी बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री व इतर उपकरणे तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होणार नाही. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे उपविभागीय अभियंता विजय प्र. जाधव यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !