वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता : भुसावळात मंत्री संजय सावकारे
‘नवरत्नां’चा सन्मान सोहळा थाटात : वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रेकींग महाराष्ट्र’वर शुभेच्छांचा वर्षाव
‘Breaking Maharashtra’ has upheld its credibility in an era of rising competition: Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (मंगळवार, 4 ऑगस्ट 2025) : अलीकडे माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. प्रिंटनंतर आता डिजिटल मिडीयाचा वेगात प्रचार-प्रसार झाल्याने परिस्थिती बदलली आहे. आजची घटना अगदी तत्काळ आपल्याला मोबाईलमधून पाहता व वाचता येते मात्र जलद न्यूज देत असताना बातमीची सत्यता तपासूनच बातमी देण्याचे काम ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलने केले आहे शिवाय समाजात चांगले कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरवण्याचा उपक्रम निश्चितपणे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे काढले. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सातव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

सन्मान सोहळ्याचा उपक्रम स्तुत्य
भुसावळ शहरातील स्टार लॉनमध्ये ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीद घेवून कार्यरत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या खान्देशातील वेब न्यूज पोर्टलचा सातवा वर्धापनदिन सोहळा रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यावल-रावेरचे आमदार अमोल जावळे, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, यावलच्या नगराध्यक्षा छायाताई पाटील, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, भुसावळातील भाजपा गटनेते युवराज लोणारी, जळगावातील लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील यांच्यासह फैजपूरातील श्री खंडेराववाडी देवस्थानचे श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर श्री.पवनकुमार दासजी महाराज, सावदा शहरातील स्वामी नारायण मंदिराचे स्वामी स्वयंमप्रकाशदासजी कोठारी व भुसावळातील श्री महंत श्री दत्त गिरणारी मठाचे श्री स्वामी ब्रह्मानंद आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलने उमटवला वेगळा ठसा
याप्रसंगी मंत्री संजय सावकारे म्हणाले की, डिजिटल मिडीया आल्याने आता उद्या वाचण्यास मिळणारी बातमी क्षणात वाचता येते मात्र अनेकदा सत्यता न तपासता बातम्या व्हायरल होतात मात्र भुसावळसारख्या शहरातून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलने बातमीची विश्वासार्हाता जपली आहे.
आता केवळ सत्य जगापुढे येणारी पत्रकारीता असेल
पत्रकार शेखर पाटील म्हणाले की, पत्रकारीता क्षेत्रापुढे आता अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. आगामी काळात केवळ जगापुढे सत्य येणारी पत्रकारीता असणार आहे. भुसावळसारख्या शहरातून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने उमटवलेला ठसा व केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.
पुरस्कारांनी वाढली जवाबदारी
पुरस्कार्थी डॉ.राजेश मानवतकर, डॉ.संगीता बियाणी, डॉ.प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने केलेल्या सन्मानाने अधिक चांगले काम करण्याची जवाबदारी वाढली असल्याचे उभयंतांनी सांगितले.
या ‘नवरत्नांचा झाला सन्मान’
विविध क्षेत्रातील नऊ मान्यवरांना याप्रसंगी गौरवण्यात आले. त्यात सामाजिक- योगेश पाटील, आरोग्य- डॉ.प्रवीण पाटील, सांस्कृतिक- उमेश नेमाडे, महिला सक्षमीकरण- आरतीताई चौधरी, पर्यावरण- रफिक शेख, शैक्षणिक- प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, यशस्वी संस्थाचालक- डॉ.संगीता बियाणी, वैद्यकीय- डॉ.राजेश मानवतकर, यशस्वी उद्योजक- सारंगधर पाटील यांना गौरवण्यात आले. शैक्षणिक कार्यासह तंबाखू सेवन न करण्याबाबत उत्तम जनजागृतीचे कार्य करणार्या भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुनील पाठक यांचा विशेष सेवा सन्मान पुरस्काराने यावेळी गौरव करण्यात आला.
‘वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन’
पुरस्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘समृद्धीपर्व’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले तर आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ वर शुभेच्छांचा वर्षाव
सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष राहून, फोनवरून तसेच सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव करीत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ पोर्टलवरील आपले प्रेम अधिक वृद्धिंगत केले. संपादक अमोल देवरे व कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.