राज्यातील दोन लाख डॉक्टर बेमुदत संपावर ! उद्यापासून इर्मजन्सीही सेवा ठप्प होणार !
संपात भुसावळातील 40 हॉस्पीटलचा सहभाग : खाजगी दवाखाने बंद असल्याने सरकारी रुग्णालयांवर रुग्णांचा ताण
मुंबई/भुसावळ (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून राज्यव्यापी अनिश्चित काळासाठी संपाची हाक दिली आहे. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या आवाहनावरून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील दोन लाखांहून अधिक अॅलोपॅथिक डॉक्टर सहभागी आहेत. दरम्यान, मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने गुरुवारी पहाटे सहा वाजेपासून इर्मजन्सी सेवा ठप्प होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका रुग्णांना बसणार असल्याने सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

राज्यभरातील रुग्णांची गैरसोय
डॉक्टरांनी अचानक काम थांबवल्यामुळे मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि जेजे रुग्णालयांसह राज्यभरातील रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ज्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनाचे मुख्य कारण महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) 30 जून रोजी जारी केलेली एक अधिसूचना आहे.
या अधिसूचनेनुसार, ज्या बीएचएमएस (होमिओपॅथी) डॉक्टरांनी सहा महिन्यांचा ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (सीसीएमपी) पूर्ण केला आहे. त्यांना आधुनिक किंवा अॅलोपॅथिक औषधे लिहून देण्याची आणि एमएमसीकडे नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अॅलोपॅथिक डॉक्टरांचा असा युक्तिवाद आहे की, एका वैद्यकीय प्रणालीत प्रशिक्षित डॉक्टरांना पूर्ण वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्याशिवाय दुसर्या प्रणालीचा सराव करण्याची परवानगी देऊ नये. त्यांच्या मते, यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरेल आणि नियामक प्रणाली कमकुवत होईल.
भुसावळात रुग्णांचे हाल
राज्यव्यापी सेवा बंदला भुसावळ शहरात 40 हॉस्पीटलांनी मंगळवार व बुधवारी कडकडीत बंदला प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी सहा वाजेपासूनच शहरातील सुमारे 40 खाजगी रुग्णालये, दवाखाने व बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद राहिल्याने उपचारासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची व रुग्णांची मोठी गैरसोय झाली. नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि नियोजित शल्यचिकित्सा (शस्त्रक्रिया) रद्द कराव्या लागल्याने रुग्णांना ताटकळावे लागले.
सरकारी रुग्णालयांत रुग्णांची मोठी गर्दी
खाजगी रुग्णालये कडकडीत बंद राहिल्याने रुग्णांचा संपूर्ण ओघ सरकारी आरोग्य यंत्रणांकडे वळला. यामुळे दिवसभर सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी रांग पाहायला मिळाली. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असला तरी त्यांनी सेवा खंडित न होऊ देता रुग्णांना मोठा दिलासा दिला.