मोठ्या आवाजात गाणी लावल्याचा वादातून भावासह पुतण्याची हत्या


मुंबई (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादानंतर भावांमध्ये झालेल्या राड्यातून भावासह त्याच्या मुलाची अर्थात पुतण्याची हत्या करण्यात आली. मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरात ही घटना घडली. हल्ल्यात मृताची पत्नी आणि लहान मुलगा मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण विक्रोळी पार्कसाईट परिसर हादरला आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळी पार्कसाईट येथील राहुल नगरमध्ये विश्वकर्मा कुटुंबाचे वास्तव्य आहे. या घरात विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकत्र राहत होते, ज्यापैकी दोघे जण घराच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. पहाटेच्या वेळी सुनील विश्वकर्मा ( 40) यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरून त्यांचे दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांना राग आला. त्यांनी सुनील यांना गाण्यांचा आवाज कमी करण्यावरून जाब विचारला.

सुरुवातीला या तिन्ही भावांमध्ये केवळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात या वादाचे रूपांतर एका भयानक हाणामारीत झाले.हाणामारी इतक्या टोकाला गेली की, सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी घरात उपलब्ध असलेल्या धारदार शस्त्रांनी थेट सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या भीषण हल्ल्यात सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचे प्राणज्योत मालवली.

या जीवघेण्या हल्ल्यात सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि त्यांचा लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या असून फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र आणि सूरज या दोन्ही आरोपी भावांना बेड्या ठोकल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !