मुक्ताईनगरात गॅस गोदाम फोडून 46 गॅस सिलिंडर लांबवले


मुक्ताईनगर (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावरील एनएच-753एल रस्त्यालगत असलेल्या इंडियन गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल 84 हजार 201 रुपये किरमतीचे 46 गॅस सिलिंडर चोरून नेले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 14.2 किलो वजनाचे 24 रिकामे घरगुती गॅस सिलिंडर, अंदाजे 52 हजार 800 रुपये किंमतीचे तसेच 10 किलो वजनाचे तीन रिकामे घरगुती सिलिंडर, अंदाजे नऊ हजार रुपये किमतीचे, तसेच 10 किलो वजनाचे तीन भरलेले घरगुती गॅस सिलिंडर, अंदाजे 11 हजार 31 रुपये किंमतीचे आणि पाच किलो वजनाचे सहा भरलेले व्यावसायिक गॅस सिलिंडर अंदाजे 11 हजार 370 रुपये किंमतीचे लांबवण्यात आले. एकूण 84 हजार 201 रुपये किंमतीचे 46 गॅस सिलिंडर चोरट्याने लांबवले. मॅनेजर दीपक समाधान कवळे (43, रा. धरणगाव, ता.मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून 18 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लिलाधर भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !