71 हजारांच्या अवैध रेल्वे तिकीटांसह मलकापूरात दलाल रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात


मलकापूर (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अवैध ई-तिकीट विक्रीविरोधात मोठी कारवाई करत मलकापूर येथे 36 ई-तिकीटे जप्त केली आहेत. या तिकिटांची एकूण किंमत 70 हजार 672 रुपये 20 पैसे असून या प्रकरणात एका व्यक्तीवर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर संतोषराव आढवे असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
आरपीएफकडून ऑपरेशन ‘उपलब्ध’ अंतर्गत 19 ऑगस्ट 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली. विश्वसनीय माहिती आणि प्राप्त डेटाच्या आधारे आरपीएफ मलकापूरच्या पथकाने संशयितावर कारवाई केली. तपासादरम्यान दिनकर संतोषराव आढवे हा अवैधरित्या ई-तिकीट विक्रीच्या प्रकारात सहभागी असल्याचे निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान त्याच्या ताब्यातून 36 ई-तिकीटे, ज्यांची एकूण किंमत 70,672.20 रुपये आहे, तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या प्रकरणी सीआर क्रमांक 294/2026 अन्वये रेल्वे कायदा कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

अवैध ई-तिकीट विक्रीविरोधात आरपीएफची सातत्यपूर्ण मोहीम
आरपीएफ मलकापूरच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी दाखविलेली सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अवैध ई-तिकीट विक्रीला आळा घालण्यासाठी तसेच सामान्य प्रवाशांना अधिकृत माध्यमातून सहजपणे तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी आरपीएफ भुसावळ विभागाकडून सातत्याने प्रभावी देखरेख आणि कारवाई केली जात आहे.

ऑपरेशन ‘उपलब्ध’ अंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई अवैध ई-तिकीटिंगविरोधातील महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आरपीएफची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

प्रवाशांना अधिकृत माध्यमातूनच तिकीट खरेदीचे आवाहन
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकिंग करताना केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटांकडून तिकीट खरेदी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अवैध तिकीट विक्री किंवा अशा प्रकारचे कोणतेही संशयास्पद प्रकरण आढळल्यास प्रवाशांनी तत्काळ जवळच्या आरपीएफ किंवा रेल्वे प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !