जर्मनीत विरावलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी : समीर पाटील यांना उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार
यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी व हल्ली किनगाव येथे वास्तव्यास असलेले एस. बी. पाटील व सुजाता पाटील यांचे चिरंजीव समीर पाटील यांनी जर्मनीतील आय.यू. आंतरराष्ट्रीय उपयोजित विज्ञान विद्यापीठातून संगणकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन करताना उल्लेखनीय यश मिळविले आहे.
पदव्युत्तर प्रबंधासाठी त्यांनी 100 पैकी 98.4 गुण मिळवत 1.0 ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली. त्यांच्या उत्कृष्ट संशोधनाची दखल घेत विद्यापीठातर्फे त्यांना उत्कृष्ट प्रबंध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.समीर यांनी जर्मनीतील बॉश कंपनीच्या सहकार्याने सेमीकंडक्टर क्षेत्रातील उत्पादन व्यवस्थापनासाठी स्वयंचलित प्रणाली विकसित केली. या प्रकल्पामुळे मॅन्युअल कामाचा सुमारे 67 टक्के भार कमी झाला असून माहितीचे व्यवस्थापन अधिक अचूक व कार्यक्षम झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यावल, विरावली व किनगाव परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


