भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात सद्भावना दिवस उत्साहात


भुसावळ (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सद्भावना दिवस तसेच स्काऊट-गाईड वचनविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या सकाळ व दुपारच्या दोन्ही शाखांमध्ये सद्भावना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व समजावून सांगितले. स्काऊट-गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध होतात. विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने शिस्त, सेवाभाव, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी यांसारखे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ध्वजारोहण व झेंडागीत स्काऊट मास्टर एस.एम.चिपळोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. गाईड कॅप्टन पी.एम.पाटील यांनी प्रार्थना घेऊन स्काऊट-गाईड वचनविधीची प्रक्रिया व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ज्येष्ठ स्काऊट मास्टर एस.पी.पाठक, एस.पी.महाजन, गाईड कॅप्टन के.एस.राणे यांनी विद्यार्थ्यांना स्कार्फ परिधान करून वचनविधीच्या माध्यमातून दीक्षा प्रदान केली.

सद्भावना दिनानिमित्त विविध धर्म, जाती, भाषा व प्रांतांमध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये बंधुभाव, एकता, परस्पर प्रेम व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने सर्वधर्म प्रार्थना व सद्भावना शपथ घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत झाली.
कार्यक्रमात गाईड कॅप्टन श्रीमती एस. एस. पाटील व सौ. एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. त्यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्ती व सेवाभावाने भारावून गेले.

के.एन.सी.टी.आय.चे प्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक एस.एल.राणे,. बी.बी.जोगी, विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एम.एस.बोंडे, स्काऊट-गाईड विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !