रावेरात कोल्ड्रींक्स विक्रेत्या तरुणासह दोघांवर प्राणघातक हल्ला : पाच संशयीतांविरोधात गुन्हा
रावेर (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : शहरातील 26 वर्षीय तरुणासह त्याच्या मामावर पाच संशयीतांनी लोखंडी रॉड मारून प्राणघातक हल्ला केला. जुन्या वादातून ही घटना शहरातील शिवाजी चौक परिसरात 21 रोजी रात्री 12.30 वाजेनंतर घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण ?
जयेश मोतीलाल शिंदे (26, रा.छत्रपती शिवाजी चौक, रावेर) हा तरुण कोल्ड्रींक्स विक्रीचा व्यवसाय करतो. 21 रोजी रात्री 12.30 वाजेनंतर संशयीत आरोपींनी जुन्या वादातून त्याच्यासह मामा जयेश चंपालाल मोपारी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. डोक्याला, पाठीला व हातपायावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी करण्यात आले.



या प्रकरणी संशयित आरोपी अल्पेश किशोर महाजन, मयूर गणेश महाजन, स्वप्निल उर्फ मोनल अनिल महाजन, निखील उर्फ सोनल महाजन आणि जय गणेश महाजन (सर्व रा.शिवाजी चौक, रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अल्पेश महाजन व मयूर महाजन यांनी लोखंडी रॉड मारला तर अन्य संशयीतांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत आज जिवंत सोडू नका, मारून टाका, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यासंदर्भात जयेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत.
