भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : गांधीधाम एक्स्प्रेसमधून 12.58 लाखांचा गांजा जप्त
मध्यप्रदेशातील दोन महिलांना अटक : गुजरातकडे गांजा वाहतुकीचा संशय
भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : पुरीगांधी एक्स्प्रेसमधून रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल 12 लाख 58 हजर 350 रुपये किंमतीचा 25.167 किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील आरोपी महिला हा गांजा गुजरातमध्ये नेत असल्याचा संशय असून या कारवाईने रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीमा करेलाल (24, सोहागपूर, सोहागपूर, जिल्हा होशंगाबाद, मध्यप्रदेश) तसेच ज्योती देविसिंग मालवीया (26, काली मंदिराजवळ, जिल्हा होशंगाबाद, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
संशय आल्याने कारवाई
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलात रेल्वे सुरक्षा दलाद्वारे ‘ऑपरेशन नारकोस’ अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोहिम राबवली जात आहे. रविवार, 23 रोजी गाडी क्रमांक 22974 अप पुरी-गांधीधाम एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी-3 मध्ये सीआयबी निरीक्षक सुनील कोली, प्रधान आरक्षक सुशील धर्मे, सोनल इंगळे तसेच सहायक सुरक्षा निरीक्षक, अकोला यांच्या पथकाकडून गस्त सुरू असताना दोन संशयित महिलांची ओळख पटविण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॉली बॅगमध्ये अमली पदार्थ लपवून नेला जात असल्याचा संशय आला.



भुसावळात यंत्रणेला अलर्ट
गाडी भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनर पोहोचल्यानंतर ड्युटीवरील सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक तायडे यांनी कर्मचार्यांसह दोन्ही संशयित महिलांना त्यांच्या ट्रॉली बॅगसह गाडीतून उतरवले तसेच भुसावळ स्थानकाचे निरीक्षक तसेच सीआयबी निरीक्षक के. एन. राय घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेची माहिती मंडल सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले. ड्युटीवरील श्वान ‘वीरू’ याने दोन्ही ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली. नियमांची पूर्तता केल्यानंतर झडतीदरम्यान बॅगेत गांजाची सहा बंडले आढळून आली. वजन केल्यानंतर गांजाचे एकूण वजन 25.167 किलो असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंदाजे किंमत 12 लाख 58 हजार 350 रुपये आहे. जप्त करण्यात आलेला गांजा तसेच दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

