‘उजेड पेरणारी माणसं’ प्रेरणा देणारा दस्तऐवज
प्रा.डॉ.जगदीश पाटील
(बालभारती सदस्य, पुणे)
भुसावळ (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : मित्रांनो, आज मी तुमच्याशी एका पुस्तकाविषयी बोलणार आहे पण खरं सांगायचं झालं तर हे फक्त एका पुस्तकाविषयीच बोलणं नाही, तर ते माणसांविषयीच बोलणं आहे. माणुसकीविषयीच बोलणं आहे. आपल्या आजूबाजूला शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता उजेड पेरत जगणार्या माणसांविषयीच बोलणं आहे.
पुस्तकाचं नाव आहे ‘उजेड पेरणारी माणसं’ आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे माझे परममित्र, संवेदनशील पत्रकार आणि लेखक श्री आनंदा पाटील यांनी.



मित्रांनो, आपण मोठ्या माणसांच्या कथा वाचतो, प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र वाचतो; पण आपल्या अवतीभोवती अशी कितीतरी माणसं असतात, जी स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी अधिक जगतात. संघर्ष करतात, अडचणींवर मात करतात, दुसर्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करतात पण त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली जात नाही. अशाच माणसांना शोधून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या संघर्षाचा आणि कार्याचा मागोवा घेऊन आनंदाभाऊंनी हे पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे.
या पुस्तकात तब्बल 84 व्यक्तींचे व्यक्तिचित्र आहेत. कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचा यात समावेश आहे आणि मला या पुस्तकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटते माहितीये? ही माणसं फक्त यात सांगितली गेलेली नाहीत, ती आपल्याला भेटली आहेत. त्यांचा संघर्ष आपल्याला जाणवला आहे. त्यांच्या वेदना जाणवल्या आहेत. त्यांची जिद्द जाणवली आहे आणि त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणाही आपल्या मनाला भिडली आहे.
मित्रांनो, आनंदाभाऊ पाटील यांच्या लेखनाचं मला विशेष कौतुक यासाठी वाटतं की त्यांची निरीक्षण शक्ती प्रचंड आहे. माणसं समजून घेण्याची त्यांची संवेदनशीलता खूप आहे. पत्रकार म्हणून त्यांनी तब्बल 25 वर्षे समाजाकडे पाहताना असंख्य माणसं जवळून पाहिली. संघर्ष पाहिला आणि त्या अनुभवातून त्यांना जाणवलं की, समाजात अजूनही अनेक माणसं आहेत जी अंधारात दिवा घेऊन उभी आहेत.
कोरोनाच्या काळातील भयानक अंधारातही त्यांनी माणुसकीचा शोध घेतला आणि त्याच काळात त्यांच्या लेखन प्रवासाला सुरुवात झाली. पुढे ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रातील लेखमालेतून त्यांनी ही व्यक्तिचित्र वाचकांसमोर आणली आणि त्याच प्रवासातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. म्हणून मला हे पुस्तक केवळ लेखांचा संग्रह वाटत नाही, तर ते एक माणुसकीचं दस्तऐवज आहे.
या पुस्तकाची भाषा देखील अतिशय महत्त्वाची आहे. लेखनात कुठेही तुम्हाला बोजडपणा दिसणार नाही. भाषा साधी, सोपी, सहज, सुलभ, प्रभावी अशी आहे. लेखक काहीतरी लिहितोय असं वाटत नाही, उलट तो आपल्याशी बोलतोय, आपल्याला एखादी व्यक्ती भेटवतोय, किंबहुना तिची कहाणी सांगतोय असं वाटतं. पुस्तकात व्यक्तिचित्र वाचताना त्या व्यक्तींचा संघर्ष आणि माणुसकीची ऊब नेहमी आपल्याला जाणवत राहते; म्हणून मला ‘उजेड पेरणारी माणसं’ हे नाव अत्यंत सार्थ वाटतं.
कारण उजेड नेहमी हा प्रकाशझोतातून येतो असं नाही. कधी एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेड पेरतो, कधी एखादा सामाजिक कार्यकर्ता एखाद्या कुटुंबाला आधार देतो, कधी एखादा कलाकार समाजाच्या जखमांना शब्द देतो, तर कधी एखादा सामान्य माणूस असामान्य काम करून जातो. अशीच माणसं समाजाला पुढे नेतात.
मित्रांनो, आजच्या काळात आपण अनेकदा यशाकडे पैसा, प्रसिद्धी आणि पदाच्या चष्म्यातून पाहतो; पण हे पुस्तक आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारतं की तुम्ही आयुष्यात किती उजेड पेरला आहे? हा प्रश्नच या पुस्तकाचं खरं यश आहे असं मला वाटतं. आनंदाभाऊ, तुम्ही पत्रकारितेच्या प्रवासात भेटलेल्या माणसांना शब्द दिला, त्यांच्या कार्याच्या शब्दांची नोंद घेतली आणि त्यांच्या संघर्षाला समाजासमोर आणलं. आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल अशा प्रकारची मौल्यवान साहित्यकृती तुम्ही निर्माण केली. या पुस्तकासाठी तुमचं अगदी मनःपूर्वक अभिनंदन!
मित्रांनो, तुम्हाला आग्रहाने सांगतो हे पुस्तक एकदा नक्की वाचा. फक्त लेखक आनंदा पाटील हे माझे मित्र आहेत म्हणून नव्हे, तर हे पुस्तक अतिशय अप्रतिम आहे म्हणून हे पुस्तक वाचा. आपल्या आजूबाजूला किती मोठी माणुसकी जगते आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. कदाचित एखादं व्यक्तिचित्र तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या माणसाची आठवण करून देईल, कदाचित एखादा संघर्ष तुम्हाला स्वतःच्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देईल आणि कदाचित पुस्तकाच्या शेवटी तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल की मीही कोणाच्या आयुष्यात थोडासा तरी उजेड पेरला आहे का? किंवा पेरू शकतो का? मला वाटतं या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तरी प्रत्येकाने ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचायला हवं.
आनंदाभाऊ, तुमच्या लेखणीला अत्यंत मनापासून सलाम आणि पुस्तकातील प्रत्येक उजेड पेरणार्या माणसाला मनःपूर्वक नमन! धन्यवाद !
