बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून वकिलाची 97 हजारात फसवणूक
चाळीसगाव (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : पंजाब नॅशनल बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून चाळीसगाव तालुक्यातील वकिलाची 97 हजार 508 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बँक अधिकारी असल्याचे सांगून संपर्क
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरा शंकर राठोड (51, रा. आंबेहोळ, ता.चाळीसगाव) यांना अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला. आपण पंजाब नॅशनल बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्याने संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन केला.



त्यानंतर संशयिताने फिर्यादीच्या व्हॉट्सप क्रमांकावर संपर्क साधून एक एपीके फाइल पाठवली. ही फाईल उघडून आवश्यक प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले.
फिर्यादीने संशयिताच्या सांगण्यावरून प्रक्रिया केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून 97 हजार 508 रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(ल), 66(व) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ करीत आहेत.
