रावेर पोलिसांची मोठी कारवाई : अल्पवयीन मुलीसह तरुणाला रूम देणार्या लॉजिंग मॅनेजरसह दोघांना अटक
रावेर (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 23 वर्षीय तरुणाला लॉजिंगमध्ये रूम उपलब्ध करून देणार्या रावेरातील हॉटेल मॅनेजरला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे शहरातील सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये कोणतीही आवश्यक नोंद न करता 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 23 वर्षीय तरुण आल्यानंतर त्यांना रूम उपलब्ध दिल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासणीत समोर आला होता. अल्पवयीन मुलीच्या संरक्षणासंदर्भातील कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप लॉजिंग व्यवस्थापनावर ठेवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
काय घडले रावेर शहरात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत नितीन सुभाष महाजन (23, रा. वाघोड, ता. रावेर) याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘फ्रेश होण्याचे’ कारण सांगून सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये आणले होते. याचवेळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून परिसरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी करण्यात येत होती. याच तपासणीदरम्यान वैशाली लॉजिंगमधील हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.



ओळखपत्राशिवाय खोली, रजिस्टरमध्येही नोंद नाही
या प्रकरणात वैशाली लॉजिंगचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (43, रा.अजंदा, ता.रावेर) याने कोणतेही ओळखपत्र न घेता तसेच लॉजिंगच्या रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद न करता संबंधितांना खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असतानाही ती न दिल्याने मॅनेजरविरुद्धही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून, लॉजिंग व्यवस्थापनाच्या भूमिकेचाही तपास करण्यात येत आहे.
या कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 406/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64 (2) (श्र), 351 (2) (3) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (झजउडज), 2012 मधील कलम 4, 16 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल. पोक्सो कायद्यातील कलम 21 अंतर्गत अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती संबंधित यंत्रणेला न देणे किंवा आवश्यक माहिती दडवून ठेवणे हेदेखील गंभीर स्वरूपाचे कृत्य मानले जाऊ शकते. प्रकरणाचा तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
या गुन्ह्याची नोंद हवालदार नितीन आमोदकर यांनी तत्काळ घेतली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.
तर होणार कठोर कारवाई
बेकायदेशीररीत्या किंवा नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही व्यक्तीस लॉजिंग अथवा हॉटेलमध्ये सुविधा उपलब्ध करून देणार्या चालक व व्यवस्थापकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रावेरात पोलिसांनी दिला आहे.
