भुसावळातील पुंडलिक बर्हाटे विद्यालयात वाचनाची गोडी वाढविण्यासाठी ‘रिडींग कॉर्नर’ उपक्रम
भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे ज्ञान व कल्पनाशक्ती विकसित व्हावी या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शहरातील पुंडलिक जी. बर्हाटे विद्यालयात ‘रिडींग कॉर्नर’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी शाळेच्या वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके भेट देण्यात आली. निखीलकुमार वायकोळे यांच्या सौजन्याने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना रीड अॅण्ड वाढा या संदेशातून नियमित वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पी.जे.चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंद यांचा उत्तम प्रतिसाद व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुस्तकांमध्ये रस दाखविला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी अध्यक्ष योगिता वायकोळे, सचिव कविता पाचपांडे, तसेच सदस्य विनिता नेवे, पल्लवी मुळे, रंजना यावलकर आणि वर्षा पाटील उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.
