शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीची विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून शिकवण : भुसावळातील एन.के.नारखेडे स्कूलचा उपक्रम
भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी इको-फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
सोप्या पद्धत्तीने बनवल्या बाप्पांच्या मूर्ती
शाळेचे कलाशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती कशी तयार करावी, याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन करताना होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून त्याची घरी स्थापना करावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सुंदर शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या.
याप्रसंगी नारखेडे परिवाराकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
