मृतांच्या वारसांना न्यायासह बेपत्ता वाहनांच्या शोधासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
दोन अपघातांतील वाहने अद्याप बेपत्ता ; सर्व आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : बायपास रस्ता बंद असल्यामुळे शहरातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे जळगाव शहरात सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली असून झालेल्या अपघातांपैकी दोन अपघातांतील वाहने अद्याप सापडलेली नाहीत त्यामुळे संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासह नुकसान भरपाई व विमा दावा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याची माहिती नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा
नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. अज्ञात आणि पसार वाहनांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही चित्रण, टोलनाक्यांवरील नोंदी, फास्टॅग व्यवहार, शहरातील प्रवेश व निर्गमन मार्गांवरील कॅमेरे तसेच अन्य तांत्रिक साधनांच्या मदतीने विशेष तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

स्वतंत्र समन्वय व्यवस्था निर्माण करण्याची मागणी
अपघातांमधील मृतांच्या कायदेशीर वारसांना विमा तसेच नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी प्राथमिक, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, तपास अहवाल, वाहनासंबंधी माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फिरावे लागू नये. ही सर्व कागदपत्रे वारसांना एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र समन्वय व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशीही मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.या गंभीर विषयाची जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तत्काळ दखल घेत अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतली. संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी, बेपत्ता वाहनांचा शोध आणि मृतांच्या वारसांना आवश्यक मदत व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकारी पोलीस विभागातील विविध शाखांमध्ये समन्वय साधून पीडित कुटुंबांना आवश्यक सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी दिला.
अधीक्षकांची संवेदनशीलता कौतुकास्पद
अपघातामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंब आधीच मोठ्या मानसिक आणि आर्थिक संकटात असते. अशा परिस्थितीत कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दाखवलेली संवेदनशीलता अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ आश्वासन न देता डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्याकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पीडित कुटुंबांना प्रत्यक्ष मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मृतांच्या वारसांच्या वेदना आणि अडचणी समजून घेत या विषयाला प्रशासकीय औपचारिकतेपुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी तातडीने डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती करण्याची भूमिका घेतली. त्यांचा सकारात्मक, संवेदनशील आणि न्यायाभिमुख प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे, असे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सांगितले.
दोषी वाहनधारकांवर हवी कठोर कारवाई
बायपास बंद असल्यामुळे शहरावर निर्माण झालेल्या वाहतुकीच्या अतिरिक्त ताणाचा आणि अपघातांच्या मालिकेचा स्वतंत्रपणे गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अपघात करून पसार झालेल्या वाहनांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मृतांच्या वारसांना विमा व नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली.

