संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

एआयसह मशीन लर्निंग व माहिती तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाहांवर संशोधकांचे सखोल विवेचन 52 संशोधक-प्राध्यापकांसह 78 विद्यार्थ्यांचा सहभाग


भुसावळ (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचारप्रवाह या विषयावर सलग बाराव्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 8 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले. या परिषदेत सुमारे 52 संशोधक व प्राध्यापक तसेच 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परिषदेत संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसह विविध विषयांवर संशोधकांनी सखोल विवेचन केले.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी केले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बी. एच.बर्‍हाटेे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.संजय इ. पाटे (एन.वाय.एन. सी. आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव), उपप्राचार्य प्रा.डॉ.गजेंद्र आर.वाणी, उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, परिषद संयोजक प्रा.डॉ.गौरी एम. पाटील व प्रा.डॉ.स्वाती पी. फालक तसेच परिषद आयोजक प्रा.डॉ.हर्षल व्ही. पाटील उपस्थित होते.

एआयचा विधायक वापर हवा
ॉ.मोहन फालक यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाला घाबरून न जाता त्याच्याशी जुळवून घेऊन त्याचा योग्य व विधायक वापर करण्याचे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींसाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य प्रा.डॉ.बर्‍हाटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पहिल्या राष्ट्रीय परिषदेत केवळ दोन ते तीन टक्के संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित होते. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या बाराव्या राष्ट्रीय परिषदेत जवळजवळ सर्वच संशोधन अहवाल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांचा हा महत्त्वपूर्ण प्रवास असल्याचेही त्यांनी सांगितले.

संशोधन प्रक्रियेवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
परिषदेचे तीन सत्रांत आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात प्रमुख वक्ते प्राडॉ.संजय इ.पाटे यांचे बीजभाषण झाले. त्यांनी रिसर्च इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इन्फारर्मेशन टेक्नालॉजी या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. संशोधन म्हणजे एखाद्या समस्या अथवा वास्तवाचा सखोल अभ्यास करून त्यावर नवीन आणि उपयुक्त उपाय शोधण्याची शास्त्रीय प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये समस्या ओळखणे, यापूर्वी झालेल्या संशोधनाचा अभ्यास करणे, त्यातील उणिवा शोधणे, नवीन पद्धत विकसित करणे आणि प्रयोगांच्या माध्यमातून तिची पडताळणी करणे या बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधनातून माहितीचा संच तयार करून तो प्रकाशित करता येतो. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान किंवा पद्धत विकसित झाल्यास त्यासाठी पेटंट मिळवता येते, तसेच संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित करता येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

द्वितीय सत्रात सहभागी संशोधकांनी विविध विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण केले. या सत्रात सेशन चेअर म्हणून प्रा.डॉ.वंदना चौधरी (उपप्राचार्य, श्रीमती जी. जी. खडसे कॉलेज, मुक्ताईनगर) आणि प्रा. डॉ.प्रियंका बर्‍हाटे (डी. एन. सी. व्ही. पी. कॉलेज, जळगाव) यांनी शोधनिबंधांचे परीक्षण केले.

सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परिषदेच्या तिसर्‍या सत्रात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते. उपप्राचार्य प्रो.डॉ.गजेंद्र आर.वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहभागी प्रा.डॉ.सचिन जोशी यांनी परिषदेचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे करण्यात आल्याचे आपल्या अभिप्रायात नमूद केले. सहभागी विद्यार्थिनी तेजल बारीने ही परिषद विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनासाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.गौरी चौधरी यांनी केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
परिषदेचे आयोजन प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.गजेंद्र आर.वाणी, प्रा.डॉ.गौरी एम.पाटील, प्रा.डॉ.स्वाती पी.फालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीचे सचिव प्रा.डॉ. हर्षल व्ही. पाटील यांच्यासह संगणकशास्त्र विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पडली.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !