भरधाव कंटेनरखाली दबून दोणगावच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
अपघातांचे सत्र कायम : धरणगाव तालुक्यात टहाकळी फाट्यावरील घटना
जळगाव (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळील टहाकळी फाट्यावर वळण घेताना नियंत्रण सुटलेला कंटेनर थेट दुचाकीवर पलटी झाल्याने दोणगावातील 20 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 9 सप्टेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. मित्राचा फोन आल्यानंतर तरुण फोनवर बोलत असतानाच अपघात घडला. किरण जनार्दन सोनवणे (20, रा.दोनगाव, ता.धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
किरण सोनवणे हा दोनगाव येथून जळगाव येथील महाविद्यालयात येण्यासाठी दुचाकीने निघाला होता. प्रवासादरम्यान मोबाईलवर कॉल आल्याने तो टहाकळी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत थांबला असताना त्याचवेळी तेथून वळण घेणार्या एका भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट किरणच्या अंगावर पलटी झाला. या भीषण अपघातात किरणचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जागीच झाला मृत्यू
किरणला तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत किरण हा आई-वडील आणि लहान भावासह दोनगाव येथे राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाळधी बायपास परिसरात सातत्याने होणार्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतापराव पाटील यांची धाव
अपघाताची माहिती कळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. पाटील बंधूंनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिका पाचारण केली व पुढील सर्व आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय मदतीसाठी यंत्रणा गतिमान केली.

