फेकरीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त
फेकरी, ता.भुसावळ (बुधवार, 23 सप्टेंबर 2026) : ग्रामीण भागात आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली, श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कांताई नेत्रालय, जळगाव आणि समता फॉउंडेशन, किन्ही यांच्या संयुक्त विद्यमाने फेकरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य उपकेंद्रात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यांची होती उपस्थिती
या आरोग्य शिबिरास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होती. फेकरी ग्रामपंचायतीच्या सरपंच चेतना भिरूड यांचीही उपस्थिती होती.
शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावातच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. रोटरी क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कांताई नेत्रालयाच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण ग्रामस्थांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यास मदत झाली. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आरोग्यसेवा आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष प्रा.डॉ.विवेक जोशी, सचिव सुधाकर सनंसे, प्राचार्य प्रा.डॉ.रमेश पी.जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधीर शर्मा, कुणाल गालफाडे, परेश शाह, अजय मिसर आणि राम पंजाबी यांच्यासह इतर पदाधिकारी व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक अदिती शर्मा, अवनी शर्मा, तेजस्विनी पटेल, कशिश यादव, आदर्श चौहान, निहाल परदेशी, सोहिल खान आणि हर्ष प्रधान यांनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
फेकरी, साकरी आणि निंभोरा बु.॥ परिसरातील आशा वर्कर्स तसेच अंगणवाडी सेविकांनी नागरिकांना शिबिराची माहिती देणे आणि लाभार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. आरोग्यवर्धिनी ग्रामीण उपकेंद्र फेकरीतील डॉ.हर्षद वाजपेयी आणि आशा सेविका यांच्या समूहाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
या शिबिरा दरम्यान 129 जणांनी नेत्र तपासणी केली तसेच 62 लोकांना मोती बिंदू प्रभावित असल्याचे आढळले. त्यापैकी 21 रुग्णांना त्वरित शास्त्रक्रिये साठी जळगावी नेण्यात आले. अन्य रुग्णांना 29 तारखेला शस्त्रक्रियासाठीच नेण्यात येणार आहे.




