धुळे एसीबीची मोठी कारवाई : दिड हजारांची लाच घेणार्‍या सांगवीतील वनरक्षकाला अटक


गणेश वाघ
भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : दुष्काळनिधीचा फार्म देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राहुल रामदास बहिरम (30, वनविभागाचे शासकीय निवासस्थान, सांगवी, ह.मु.धवळीविहिर, जेबापूर, ता.साक्री) यास धुळे एसीबीने गुरुवारी सायंकाळी उशिरा अटक केल्याने वनविभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांना उदरनिर्वाहासाठी वनविभागाकडून राखीव शेतजमीन मिळाली असून शासनाकडून शिरपूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने दुष्काळनिधी मिळवण्यासाठी जे फार्मची आवश्यकता असल्याने तक्रारदाराच्या वडिलांसह वकवाड गावातील इतर 14 शेतकर्‍यांनी अर्ज वनविभागाच्या सांगवी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनरक्षक राहुल बहिरम यांच्याकडे जमा केले. गुरुवार, 8 रोजी बहिरम यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी फार्म देण्यासाठी प्रति फार्म शंभर रुपये लाचेची मागणी केली.

सापळा रचून वनरक्षक जाळ्यात
एकूण एक हजार 500 रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सापळा रचला व वनरक्षक राहुल बहिरम यांनी तक्रारदाराकडून एक हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळत्त धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, एएसआय राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, मकरंद पाटील, रामदास बारेला आदींच्या पथकाने यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !