नंदुरबार जीएसटी कार्यालयातील राज्य कर अधिकार्यासह निरीक्षक नाशिक एसीबीच्या जाळ्यात
नवापूरातील हॉटेलमध्ये स्वीकारली 50 हजारांची लाच : बड्या अधिकार्यांवर कारवाईने लाचखोर हादरले
नवापूर (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : 50 हजारांची लाच स्वीकारताना नंदुरबार वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी संदीप देवराम पाटील (45, इंदिरा संकुलामागे, सरगम कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार, मूळ रा.साने गुरुजी कॉलनी, जळगाव) व राज्य कर निरीक्षक विवेक विश्वनाथ घोडके (प्लॅट नंबर 75, गुरुकृपा विमल विहार कॉलनी, नंदुरबार) यांना नाशिक एसीबीने गुरुवारी सायंकाळी नवापूर शहरातील हॉटेलात रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदाराच्या मालकीचा स्टील व सिमेंटचा व्यवसाय असून ते जीएसटीचा नियमित भरणा करतात. तक्रारदाराला 2022-23 या आर्थिक वर्षाच्या जीएसटी विवरणपत्राच्या पडताळणीदरम्यान काही त्रृटी आढळल्याने नंदुरबार जीएसटी कार्यालयाकडून दोन नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटीसांचे उत्तर त्यांनी त्यांच्या सीएमार्फत पाठवले होते. त्यानंतर सन 2022-23 व सन 2023-24 या आर्थिक वर्षांच्या जीएसटी वार्षिक विवरणपत्रांमध्ये त्रृटी असल्याचे कारण देत पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. वरील नोटीसा व कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्याच्या मोबदल्यात राज्य कर निरीक्षक विवेक घोडके यांनी एक लाखांची लाच मागितली होती. गुरुवारी तक्रारदाराने या संदर्भात नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.
नवापूरात हॉटेलमध्ये स्वीकारली लाच
तक्रादाराला आरोपींनी नवापूर शहरातील सुरत-धुळे महामार्गावरील हॉटेल उर्विशा येथे लाच देण्यासाठी बोलावल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून आरोपींनी लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने आरोपींना अटक केली. आरोपींविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई लाचलुचपत नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे, हवालदार गणेश निंबाळकर, हवालदार नितीन नेटारे आदींच्या पथकाने यशस्वी केला. सापळ्याचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले.


