भाजपा नगरसेवक एक लाख 20 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
नगरोत्थान योजनेतील कामांच्या बिलासाठी तीन लाखांची मागणी; गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गडचिरोली (शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026) : नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विद्युत केबल टाकण्याच्या कामांच्या बिलाच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच मागून एक लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना अहेरी नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवक अमोल विलासराव गुडेलीवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी अहेरी येथील त्यांच्या हार्डवेअर दुकानात ही सापळा कारवाई करण्यात आली. दरम्यान, अमोल गुड्डेलीवार हे माजी राज्यमंत्री अमरीश आश्रम यांचे खंदे समर्थक असून त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असलातरी मात्र स्वीकृत सदस्य म्हणून नगरपंचायतीमध्ये त्यांची वर्णी लावण्यात आली.
बिलाच्या 15 टक्के रकमेची मागणी
तक्रारदार हे इलेक्ट्रिकल ठेकेदार असून त्यांचे अहेरी येथे इलेक्ट्रिकल दुकान आहे. त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना 2025-26 अंतर्गत अहेरी नगरपंचायत क्षेत्रात अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे काम मिळाले होते. प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील कामाची मंजूर निविदा रक्कम 9 लाख 93 हजार 909 रुपये, तर प्रभाग क्रमांक 11 ते 17 मधील कामाची रक्कम 9 लाख 93 हजार 856 रुपये होती. या दोन्ही कामांची एकूण रक्कम 19 लाख 87 हजार 765 रुपये होती.





तक्रारदाराने आपल्या मित्राच्या फर्मच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 ते 17 मधील काम करारनाम्यानुसार पूर्ण केले होते. तसेच, मित्राच्या कामावरही ते देखरेख ठेवत होते. दोन्ही कामे निर्धारित 180 दिवसांच्या मुदतीत पूर्ण झाल्यानंतर त्यांची संपूर्ण बिले अदा झाली होती. त्यानंतर अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेलीवार यांनी संबंधित कामे जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली येथून आपण मंजूर करून आणल्याचे सांगत, बिलाच्या मोबदल्यात 15 टक्क्यांप्रमाणे तीन लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
यापूर्वी 30 हजार रुपये दिल्याचा दावा
आरोपीकडून वारंवार लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने नाईलाजाने 5 ऑगस्ट 2026 रोजी 30 हजार रुपये रोख दिले होते. मात्र त्यानंतरही उर्वरित 2 लाख 70 हजार रुपयांची मागणी सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
पडताळणीनंतर सापळा ; 1.20 लाख रुपये स्वीकारताना पकडले
तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच आणि व्हॉइस रेकॉर्डरसह लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने उर्वरित दोन लाख 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याची माहिती आहे. तक्रारदाराने सध्या 1 लाख 20 हजार रुपये उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर आरोपीने ती रक्कम हार्डवेअरच्या दुकानात आणून देण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 1 लाख 20 हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
गोंदिया एसीबी पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांच्या नेतृत्वात एएसआय चंद्रकांत करपे, हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर तसेच पोलीस कर्मचारी संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे आणि दीपक बाटबर्वे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
