14 हजार 203 प्रवासी मुंबईत दाखल


वंदे भारत अभियान : आणखी 71 विमानांनी येणार प्रवासी

मुंबई : वंदे भारत अभियानांतर्गत 87 विमानातून तब्बल 14 हजार 203 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 71 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. आलेल्या एकूण 14 हजार 203 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या पाच हजार 248 इतकी आहे. उर्वरीत महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या चार हजार 615 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या चार हजार 340 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार कॉरंटाईन करण्यात येत आहे.

या देशातून आले प्रवासी
आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड,केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर आदी देशांचा समावेश आहे. मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !