जामनेर पोलिसांनी गांजा शेतीवर फिरवला बुलडोझर : तीन लाख 35 हजारांचा गांजा जप्त

संशयीत पसार : 13 किलो 430 ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त


जामनेर (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी गावाच्या शिवारात स्व- मालकीच्या शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची हिरवी ओली झाडे मुळासह जप्त करण्यात आली. त्यांचे एकूण वजन 13 किलो 430 ग्रॅम आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत तीन लाख 35 हजार 750 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित शेतमालक अनिल दगडू पाटील (मालदाभाडी) हा पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पसार झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास मालदाभाडी (ता. जामनेर) गावाच्या शिवारातील अनिल दगडू पाटील यांच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती जामनेर पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता शेतात गांजाची हिरवीगार ओली झाडे आढळून आली. या झाडांना पाने, फुले, फळे व फांद्या होत्या. मुळापासून शेंड्यापर्यंत या झाडांची उंची अंदाजे 7 ते 8 फूट असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.









पोलिसांनी या ठिकाणाहून एकूण 13 किलो 430 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मुळासह जप्त केली. प्रतिबंधित गांजाची किंमत प्रतिकिलो 25 हजार रुपये या दराने एकूण ती लाख 35 हजार 750 रुपये निश्चित करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयित अनिल दगडू पाटील हा घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस धिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !