म्हसावदला दीड कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने खळबळ
एक हजार 486 मद्याचे खोके जप्त : दोन संशयितांचा शोध सुरू
नंदुरबार (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : परराज्यांत विक्रीसाठी असलेल्या मद्याची महाराष्ट्रात अवैध साठवणूक करून विक्री करण्याचा मोठा प्रकार शहादा तालुक्यातील म्हसावद येथे उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने राणीपूर रस्त्यावरील एका गोदामावर छापा टाकत तब्बल एक कोटी 45 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध मद्यव्यवसाय करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाला 4 नोव्हेंबर रोजी म्हसावद येथील नवा प्लॉट परिसरातील गोदामात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने राणीपूर रोडवरील संबंधित गोदामावर छापा टाकला. गोदामाची तपासणी केली असता परराज्यांत विक्रीसाठी असलेला मद्याचा मोठा साठा आढळून आला.








या कारवाईत गोवा राज्यात निर्मित आणि तेथे विक्रीसाठी असलेली 180 मिली क्षमतेची रॉयल ब्ल्यू व्हिस्की, तसेच सिल्वासा येथे निर्मित व विक्रीसाठी असलेली 180 मिली क्षमतेची ऑक्सिजन व्होडका जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकारच्या मद्याचे एकूण 1 हजार 486 खोके पथकाने ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची एकूण किंमत 1 कोटी 45 लाख 92 हजार रुपये असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदामाचे जागामालक किशोर लांडगे आणि सत्तार ठाकरे यांचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतला जात आहे.
अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात निरीक्षक आर.के.सकपाळ, व्ही.ए.चौर, दुय्यम निरीक्षक ए.एस.गायकवाड, पी.व्ही.मोरे, एच.पी.घरटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हितेश जेठे, बी.डी.बागले, जवान एम.एन.पाडवी, कपिल ठाकूर आणि राहुल साळवे यांचा समावेश होता.