अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा अध्याय संपला ! सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

विलीनीकरणाची तारीखही झाली होती निश्चित ; अजित पवार हयात असेपर्यंत दोन्ही पक्षांत चर्चा सुरू होती, आता विषयाला कायमचा पूर्णविराम


पुणे (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. एवढेच नव्हे, तर विलीनीकरणाची तारीखही निश्चित झाली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला आपल्या मनात आणि पक्षात कायमचा पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

विलीनीकरणाची तारीखही ठरली होती!
पुण्यात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, अजित पवार हयात होते तोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात संवाद झाला होता. एवढेच नाही, तर विलीनीकरणासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या प्रक्रियेला आपल्या मनात, अंतःकरणात आणि पक्षात कायमचा पूर्णविराम मिळाला आहे.

आमच्याकडून विलीनीकरणाबाबत कोणतेही विधान नाही
विलीनीकरणाच्या चर्चांवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असल्याबद्दल सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आठ वर्षांतील विधाने तपासली, तर आमच्या पक्षाकडून या विषयावर एकही अधिकृत विधान आलेले नाही. पक्षाचा कोणताही प्रवक्ता गेल्या अनेक महिन्यांत याबाबत बोललेला नाही. अजित पवार गटाकडून या विषयावर जी विधाने करण्यात आली, त्यावरही आम्ही कधीही प्रतिवाद केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय चर्चांपेक्षा देशातील प्रश्न महत्त्वाचे
केवळ पक्षीय राजकारण आणि विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये अडकून न राहता देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, असे मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. देशातील वाढती महागाई, जागतिक स्तरावरील इंधनाचे दर, अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम तसेच ’वन नेशन, वन इलेक्शन’ यांसारख्या धोरणात्मक विषयांवर माध्यमांनी प्रश्न विचारावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वारंवार तोच प्रश्न विचारू नका!
विलीनीकरणाबाबत यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारू नये, अशी हात जोडून विनंती केली. मी पुन्हा तेच उत्तर दिल्यास तुमच्या चॅनेलचा आणि माझाही टीआरपी कमी होईल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या या स्पष्ट विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बदललेली राजकीय परिस्थिती आणि सुळे यांनी घेतलेली ठाम भूमिका यामुळे राज्याच्या राजकारणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !