आदिवासी विकासाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत
यावलला जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यात 81 विशेष शिबिरांचे आयोजन
यावल (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026’चा आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे उत्साहात समारोप झाला. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील आदिवासी गावे व पाड्यांवर आयोजित 81 विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून हजारो पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात आले. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोप सोहळा झाला.
आदिवासी समाजाचा गौरवशाली
इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सांस्कृतिक वारसा आणि अस्मितेचे जतन करण्यासह शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
पाणी, वीज आणि महिला सबलीकरणावर भर
आदिवासीबहुल भागात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी 12.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वीजपुरवठ्यापासून वंचित पाड्यांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करून देण्याचे काम प्रस्तावित आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, हस्तकला, वनोपज व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी यावल येथे दोन कोटी रुपये खर्चून ‘बहिणाई मॉल’ उभारण्यात येत आहे. त्यात शिलाई मशीन, आधुनिक स्वयंपाकघर आणि विक्रीसाठी स्वतंत्र दालन असेल, अशी माहिती आमदार जावळे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे, आधार, बँक खाते व मोबाईल क्रमांक संलग्न ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पुढील दीड ते दोन महिन्यांत शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी गावोगावी शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या. या कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
लाभार्थ्यांना योजनांचे वितरण ; गुणवंतांचा गौरव
समारंभात 92 महिला बचत गटांना लाभ, चार लाभार्थींना ट्रॅक्टर आणि 16 आदिवासी शेतकर्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासह वनपट्टे व राशन कार्डांचे वितरण करण्यात आले. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त 16 शिक्षकांचे स्वागत, तर पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आदिवासी पारंपरिक वैद्य आणि वारली चित्रकलेच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देणार्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला. प्रकल्प कार्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 34 जणांनी रक्तदान केले, तर 40 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आधार नोंदणी, कृषी मार्गदर्शन, पारंपरिक उपचार, पेसा जनजागृती आणि व्यसनमुक्तीविषयक पथनाट्य असे उपक्रमही राबविण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी यांनी केले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
