गोव्यातील कॅसिनोचा जुगार भोवला ! फळविक्रेत्याने चोरल्या 16 दुचाकी ; 24 वर्षीय तरुणाला अटक


कोल्हापूर (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्याच्या व्यसनापायी एका तरुणाने चक्क वाहनचोरीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या 24 वर्षीय तरुणाने पैशांची गरज भागवण्यासाठी इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरातून दुचाकी चोरल्या. विशेष म्हणजे, चोरीच्या दुचाकी विकण्याऐवजी त्या गहाण ठेवून पैसे मिळवायचे आणि त्यातून गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळायचा, अशी त्याची कार्यपद्धती होती. शिवाजीनगर पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून दुचाकी चोरीचे 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रदीप बाळू मस्के (वय 24, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. इचलकरंजी येथील अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता. शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.

पोलिसांनी प्रदीप मस्के याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, इचलकरंजी आणि कोल्हापूर शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर वाहनचोरीमागील जुगाराचे धक्कादायक कारणही उघड झाले.

चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून कॅसिनोमध्ये जुगार
संशयित चोरीच्या दुचाकींची थेट विक्री करत नव्हता. त्याऐवजी वेगवेगळ्या व्यक्तींकडे त्या गहाण ठेवून पैसे मिळवत होता. या पैशांचा वापर तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या तरुणाने जुगाराच्या व्यसनापायी वाहनचोरीचे सत्र सुरू केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 16 गुन्हे
पोलिस तपासात चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7, गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5, शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 दुचाकी चोरीचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण 16 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी 14 मोपेड पोलिसांनी जप्त केल्या असून, त्यांची अंदाजे किंमत 4 लाख 20 हजार रुपये आहे. उर्वरित दोन दुचाकींचा शोध सुरू आहे. जप्त केलेली वाहने त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

दुचाकी गहाण घेणार्‍यांचीही होणार चौकशी
चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून घेणार्‍या व्यक्तींची भूमिका आता पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आहे. संबंधितांनी वाहनांची कागदपत्रे तपासली होती का, त्यांना वाहन चोरीचे असल्याची माहिती होती का आणि या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

तपास पथकाला 20 हजारांचे बक्षीस
पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, उपनिरीक्षक प्रवीण साणे, अनिल चव्हाण यांच्यासह तपास पथकाने या गुन्ह्यांचा छडा लावला. पथकाच्या कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी ही माहिती दिली.

जुगाराच्या व्यसनापायी वाहनचोरीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप असलेल्या या तरुणाच्या कारनाम्याने इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या दुचाकी गहाण ठेवण्याच्या व्यवहारांमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !