शालार्थ आयडी प्रकरणात विनोद तराळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; अटकेपासून अंतरिम संरक्षण


नाशिक (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : शालार्थ आयडी प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेत आलेले शिवसेना पदाधिकारी तथा माफदा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद रामदास तराळ यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना तूर्तास अटक करता येणार नाही, असे अंतरिम संरक्षण न्यायालयाने दिले आहे मात्र तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्याने या प्रकरणातील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित
न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2026 रोजी विनोद तराळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाला आव्हान देत तराळ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (डङझ) दाखल केली होती.

फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचे आरोप
नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(5), 318(4), 336(3), 338, 340(2) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे. यामध्ये विश्वासघात, फसवणूक तसेच बनावट कागदपत्रांशी संबंधित आरोपांचा समावेश आहे.

राज्य सरकारला नोटीस ; अटकेला तूर्तास स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला नोटीस बजावली असून, राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. पार्वती नांबियार यांनी नोटीस स्वीकारली. तसेच तराळ यांची याचिका यापूर्वीपासून प्रलंबित असलेल्या डङझ (उीश्र.) क्रमांक 20018/2026 या प्रकरणासोबत जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकरणाचा पुढील निर्णय होईपर्यंत विनोद तराळ यांना अटक करू नये, असे अंतरिम संरक्षण न्यायालयाने दिले आहे. त्याचबरोबर तपास यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष !
सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश अंतरिम स्वरूपाचा आहे. त्यामुळे विनोद तराळ यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झालेली नाही किंवा प्रकरणाचा अंतिम निकालही लागलेला नाही. तपास यंत्रणांचा तपास सुरूच राहणार असून, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे त्यांना बंधनकारक असेल. दरम्यान, या प्रकरणामुळे मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात आधीपासूनच चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय स्तरांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे तराळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !