कजगावातील 23 वर्षीय तरुणावर किरकोळ वादातून गोळीबार : तरुण गंभीर
भडगाव (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील 23 वर्षीय तरुणावर तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून तिघांनी गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार, 24 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने भडगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली. गोळीबारात जयेश ज्ञानेश्वर पवार (23, कजगाव) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर धुळ्यातील सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामावर जाताना गोळीबार
कजगावातील रहिवासी असलेला जयेश पवार हा तरुण कजगाव परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या त्रिकूटाने त्याच्यावर हल्ला केला. तरुणाची पत्नी दिव्या जयेश पवार (20) हिने भडगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत (कजगाव) व अन्य दोन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींनी तीन गोळ्या झाडल्याची चर्चा असून तरुणाच्या छातीसह डोक्यास गोळी लागल्याचे सांगण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला धुळ्यातील सेवा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत.
पोलीस दलाने उचलावीत ठोस पावले
जळगाव जिल्ह्यात गोळीबाराच्या सातत्याने घडत असलेल्या घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरातही गोळीबाराची घटना घडली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर वचक निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
