ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील 12 बालकांसह गर्भवती मातेची आरोग्य तपासणी

यावल तालुक्यात अतितीव्र कुपोषित दोन बालके आढळली


यावल (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या पाडळसा उपकेंद्राच्या गुळपट्टी येथील उसतोड कामगारांच्या कुटुंबांची राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक क्रमांक एकमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच कुटुंबांतील 0 ते 18 वयोगटातील एकूण 12 बालकांची तसेच एका गर्भवती मातेची प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन अतितीव्र कुपोषित बालके आढळल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

तपासणीत आढळली कुपोषित बालके
पाडळसा, ता.यावल या गावालगत असलेल्या गुळपट्टी या पाड्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक क्रमांक एकमार्फत विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या तपासणी मोहिमेत पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली रुपेश निकुंभ, डॉ. मोहनीश भोपे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (एमपीडब्ल्यू) घोडगे आणि आशा वर्कर शारदा तुषार पाटील यांनी येथील महिला व बालकांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य तपासणीदरम्यान दोन बालके तीव्र कुपोषित (सॅम) आढळून आली. या बालकांना पुढील उपचार व आवश्यक वैद्यकीय सेवेसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले तसेच गर्भवती मातेची प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी करण्यात आली. संबंधित मातेची सोनोग्राफी झालेली असून धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक लसीकरणही पूर्ण झाले आहे.

पाच कुटूंबातील बालकांची उपस्थिती
गुळपट्टी परिसरात उसतोड कामगारांची एकूण 12 कुटुंबे वास्तव्यास असून, त्यापैकी पाच कुटुंबांतील बालके या आरोग्य तपासणीवेळी उपस्थित होती. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने ही तपासणी मोहीम महत्त्वपूर्ण ठरली.

यावल रुग्णालयात सध्या उपचार
आरोग्य तपासणी मोहिमेत अतितीव्र कुपोषित दोन बालके आढळली आहेत. या बालकांवर सध्या यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळप्रसंगी त्यांनी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्याची तजवीज ठेवली असल्याचे प्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ.वैशाली निकुंभ यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !