कळमसरा स्नेहमिलनाचा अविस्मरणीय सोहळा : साडेपाचशे आप्तस्वकीयांची उपस्थिती ; चार-पाच पिढ्या आल्या एकत्र!
पाचोरा (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : गावाची माती, बालपणीच्या आठवणी आणि पिढ्या न पिढ्या जपलेली नाती यांचा अनोखा संगम नुकताच कळमसरा येथे अनुभवायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कळमसरा या गावाशी नाळ जोडलेल्या जैन परिवारांचा भव्य स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सुमारे साडेपाचशे आप्तस्वकीयांनी उपस्थिती लावत चार ते पाच पिढ्यांचा अनोखा स्नेहबंध पुन्हा एकदा अनुभवला. विखुरलेली कुटुंबे, जुन्या आठवणी आणि आपुलकीच्या नात्यांना एकत्र आणणारा हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
18 कुटुंबांची गावाशी आजही कायम नाळ
एकेकाळी कळमसरा गावात जवळपास 18 जैन कुटुंबे गुण्यागोविंदाने राहत होती. कालांतराने शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि रोजगाराच्या निमित्ताने ही कुटुंबे देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी आपले स्थान निर्माण केले; मात्र गावाशी असलेले नाते आणि पूर्वजांनी दिलेले संस्कार कायम जपले. याच आपुलकीतून सर्व कुटुंबीयांना पुन्हा एकत्र आणण्याची संकल्पना पुढे आली.
सहा युवकांचा पुढाकार ; तीन महिन्यांचे नियोजन
या स्नेहमिलनाच्या आयोजनासाठी पारस ललवाणी, सुगन मुनोत, प्रा. डॉ.दिलीप ललवाणी, सुशील ललवाणी, डॉ.जीवन कटारिया आणि आदेश ललवाणी या सहा युवकांनी पुढाकार घेतला. जवळपास तीन महिने त्यांनी सातत्याने नियोजन व मेहनत घेतली. निमंत्रण, निवास, भोजन, स्वागत आणि कार्यक्रम व्यवस्थापन अशा प्रत्येक बाबीची काळजी घेतली. त्यांच्या या प्रयत्नांना संपूर्ण कळमसरा परिवाराने उत्स्फूर्त सहकार्य दिले आणि सहा युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
चार-पाच पिढ्यांचा भावनिक मिलाप
या सोहळ्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे चार ते पाच पिढ्यांतील सदस्य एकाच व्यासपीठावर एकत्र आले. आजी-आजोबा, मुले, नातवंडे आणि पुढील पिढ्यांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मित्रांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वर्षानुवर्षे न भेटलेल्या भाऊ-बहिणींच्या भेटीने अनेकांचे डोळे पाणावले. माहेरच्या आठवणींनी अनेक भगिनी भावांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंनी आपल्या भावना व्यक्त करताना दिसल्या.
विखुरलेल्या कुटुंबांना एकत्र आणणारा अभिनव उपक्रम
एका गावातील विखुरलेली सर्व जैन कुटुंबे आणि त्यांच्या चार-पाच पिढ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. केवळ मनोरंजन किंवा भेटीगाठी एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नव्हता, तर पूर्वजांनी जपलेली नाती, संस्कार आणि गावाशी असलेले भावनिक नाते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. उपस्थितांनीही या उपक्रमाचे कौतुक करत असा स्नेहसोहळा दुर्मिळ असल्याची भावना व्यक्त केली.
पुन्हा भेटण्याच्या आशेने निरोप
कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपापल्या कर्मभूमीकडे परतले; मात्र प्रत्येकाच्या मनात पुन्हा एकदा भेटण्याची ओढ निर्माण झाली. कळमसराच्या गल्ल्या, बालपणीच्या आठवणी आणि गावातील माणसांचे प्रेम या सर्व गोष्टींनी उपस्थितांना भावूक केले. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपण्याचा सुंदर संदेश या स्नेहमिलनातून मिळाला. आपण कुठेही राहिलो, कितीही प्रगती केली, तरी जन्मभूमीचे ऋण आणि आपल्या माणसांशी असलेले नाते विसरता कामा नये, ही भावना या सोहळ्याने अधोरेखित केली. या अविस्मरणीय आयोजनासाठी पुढाकार घेणार्या सहाही युवकांचे आणि सहकार्य करणार्या संपूर्ण कळमसरा परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गाव सोडले, पण गावपण सोडले नाही ; घरे बदलली, पण नाती बदलली नाहीत. कळमसरा हे केवळ गाव नसून प्रत्येक कळमसरेकराच्या हृदयात जपलेली भावना आहे, याची प्रचिती या स्नेहमिलनाने दिली. एक गाव, एक परिवार आणि अनंत आठवणी कळमसरा स्नेहमिलनाचा हा सोहळा पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
