संजय शिरसाटांवर पाच कोटींच्या लाचेचा आरोप ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
उदगीरच्या अण्णा भाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या 25 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी 20 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप ; 72 व्या मजल्यावरील खासगी निवासस्थानी पैसे मागितल्याचा दावा, शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे प्रस्तावित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी 20 टक्के रक्कम मागितल्याचा दावा करत राऊत यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता संबंधित मंत्र्यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेमका काय आहे 5 कोटींच्या लाचेचा आरोप?
संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील नरसिंग उदगीरकर यांच्या आरती सेवाभावी संस्थेमार्फत उदगीर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी 6 ऑक्टोबर 2025 रोजी समाजकल्याण विभागाकडे 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने उदगीरकर यांना वारंवार मंत्रालयात हेलपाटे मारावे लागत होते.
यादरम्यान मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांनी मंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय काम होणार नसल्याचे सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यानंतर मुंबईतील 72 व्या मजल्यावरील खासगी निवासस्थानी झालेल्या भेटीत प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 25 कोटींच्या रकमेपैकी 20 टक्के म्हणजेच सुमारे 5 कोटी रुपये मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एसीबीकडे तक्रार केल्याचा उदगीरकरांचा दावा
नरसिंग उदगीरकर यांनी या कथित लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पुन्हा मंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर ओएसडींकडून ’वरळीला गेला होतात का?’ अशी विचारणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पैसे दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
एसीबीच्या कारभारावरही राऊतांचे प्रश्न
या प्रकरणात एसीबीकडूनच मंत्र्यांना संभाव्य सापळ्याची माहिती दिली गेल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. याबाबत गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी करत राज्यातील पोलीस यंत्रणा आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील मंत्री आणि प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपांची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने उभारण्यात येणार्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावासाठीच पाच कोटींची मागणी होत असेल, तर हा कसला दलितोद्धार?’ असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
