जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले ; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता
मयत महिला विमा घोटाळ्यातील संशयीत असल्याने हत्येचा संशय : मंत्री गिरीश महाजनांची जाणली माहिती
जळगाव (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्ह्यातील एका मजूर कुटुंबासोबत गुजरातमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. कामाच्या शोधात गुजरातला निघालेल्या पाटील कुटुंबातील सदस्यांना सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत पती-पत्नीसह एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, हे कुटुंबातील महिला मेहुणबारे पोलिसात दाखल विमा घोटाळा प्रकरणातील संशयीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साक्षीदारांना संपवण्यासाठी हा प्रकार घडवण्यात आला का ? या दिशेने तपास सुरू आहे.
चौघांनी वाहन अडवत फेकले तलावात
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी कामाच्या शोधात चारचाकी वाहनाने गुजरातच्या सूरतकडे निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचल्यानंतर दुसर्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढून कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याची तक्रार आहे. या घटनेत 13 वर्षीय मुलाने पाण्यातील पाइपचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्याने जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली.
कालव्यात आढळले तिघांचे मृतदेह
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवली असता महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरातील उकाई-काकरापार कालव्यात तीन मृतदेह आढळले. मृतांमध्ये नितीन ऊर्फ भुरिया पाटील, कविता पाटील आणि एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. कुटुंबीयांनी मृतदेहांची ओळख पटवली आहे. प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
विमा घोटाळ्यातील साक्षीदार असल्याची माहिती
या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मृत पाटील कुटुंब कथित विमा घोटाळा प्रकरणातील साक्षीदार तसेच महिला ही संशयीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर साक्षीदारांनाच लक्ष्य करण्यात आले का, याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणातील कथित विमा घोटाळ्याशी संबंधित माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले.
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासह घटनेमागील नेमके कारण आणि विमा घोटाळ्याशी असलेला संभाव्य संबंध यांचा पोलीस तपास करत आहेत. जळगाव जिल्हा पोलिसही सूरत ग्रामीण पोलिसांच्या संपर्कात असून प्रकरणाची माहिती घेत आहेत. एका मजूर कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलांचा शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
