यावल शहरातील दोन सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने कारवाई


जळगाव (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. वारंवार गुन्हे करून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणार्‍या यावल शहरातील दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. समशेर शहा सलीम शहा (28, रा. बाहेरपुरा, चोपडा नाका, यावल) व समीर उर्फ भांजा रहेमान तडवी (23, रा.तडवी कॉलनी, यावल) अशी हद्दपार आरोपींची नावे आहेत.

भुसावळ आणि यावल परिसरात गुन्ह्यांचे जाळे
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी टोळी तयार करून भुसावळ शहर, यावल पोलीस स्टेशन हद्द तसेच लोहमार्ग हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. आरोपींविरोधात तब्बल सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती यंत्रणेने दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आणि त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याने यावल पोलीस स्टेशनमार्फत हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षकांनी अधिकाराचा वापर करीत केली कारवाई
या प्रस्तावाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. चौकशी व उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 55 अन्वये दोन्ही आरोपींना जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळवणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी कृत्यांमध्ये वारंवार सहभागी होणार्‍या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !