लाच भोवली : मेहुणबार्‍याच्या पोलिस कर्मचार्‍याला चार वर्ष शिक्षा


जळगाव : छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पाच हजार रुपयांची लाच घेतांना मेहुणबारे पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजय श्रीराम पाटील यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने पाटील यास चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी मंगळवारी हा निकाल दिला. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील तक्रारदाराच्या बहिणीने सासरच्या लोकांविरुध्द मेहुणबारे पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास विजय पाटील याच्याकडे होता. आरोपींना अटक करावी म्हणून तक्रारदाराने 26 मे 2015 रोजी विजय पाटील यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची विनंती केली होती, त्यावर पाटील याने त्यांच्याकडे पाच हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणात तक्रारदार अशिक्षित असून त्याला लिहिता व वाचता येत नाही, त्यामुळे सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी तक्रार शाबीत करण्यासाठी तक्रारदाराला तक्रार लिहून देणारे बहादूर मजीद पठाण यांची मदत घेतली. जळगाव न्यायालयाचे न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात तत्कालिन सक्षम अधिकारी तथा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व तपासाधिकारी विजय चौरे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. लाच मागणी कलमाखाली तीन वर्ष व लाच स्विकारली म्हणून चार वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी अनिल सपकाळे केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले. सरकारतर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.