भुसावळातील मुस्लीम बहुल मतदान केंद्रावर सकाळीच लागल्या रांगा

गेल्या अनेक वर्षानंतर बदलले चित्र : मतदान केंद्रावर गैरसोयींचा पाढा : मतदान यादीतून नावे गायब झाल्याने मनस्ताप


भुसावळ : देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात शहरातील नागरिकांनी हिरारीने सहभाग घेत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 रोजी झालेल्या निवडणुकीत सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान 57.33 टक्के मतदारांनी हक्क बजावला. एरव्ही मुस्लीम बहुल भागात सकाळच्या वेळी मतदानाचा आकडा अल्प असलातरी यंदा मात्र अनेक वर्षानंतर चित्र बदलल्याचे दिसून आले. मुस्लीम महिला व पुरूष मतदार सकाळी सात वाजेपासूनच उत्स्फूर्तपणे बाहेर पडले व मतदान केंद्रावर रांगा लावून असल्याचे दिसून आले. शहरातील अन्य मतदान केंद्रावर मात्र पाहिजे तितका उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी एक वाजेपर्यंत दिसून आला नाही मात्र दुपारनंतर अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली तर मतदार यादीतून अनेकांची नावे गायब झाल्याने त्यांना आपल्या पावली माघारी परतण्याची वेळ आली.



मुस्लीम बहुल भागात उत्स्फूर्त मतदान
भुसावळातील खडका रोडवरील अंजुमन उर्दू हायस्कूलला भेट दिल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले तर एम.आय.तेली उर्दू हायस्कूल, नगरपालिका शाळा क्रमांक 20, उसामा उर्दू हायस्कूल, एम.आय.तेली इंग्लिश स्कूल, बी.झेड.उर्दू हायस्कूल भागात न भू,तो न भविष्यती अशी मुस्लीम महिला व पुरूष मतदारांची गर्दी दिसून आली. आबालवृद्धांसह नवतरुण मतदारांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. अत्यंत शिस्तीत व रांगेत मतदारांच्या वरील सर्व केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून रांगा लागल्याचे चित्र होते. शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात व भुसावळ हायस्कूलमध्ये मतदारांची मोठी गर्दी दिसून आली.

पावसामुळे दोन तास व्यत्यय
सोमवारी लोकसभा निवडणुकीला शांततेत सुरूवात झाल्यानंतर सकाळी साडेआठ ते पावणेनऊ वाजता अचानक वातावरणात बदल होवून पावसाला सुरूवात झाली तर काही वेळेने पावसाचा वेग वाढला. वाढत्या पावसामुळे मतदारांची त्रेधा-तिरपीट उडाली तर मतदान केंद्राबाहेरील उमेदवारांच्या पोलिंग बुथलाही पावसाचा फटका बसला. दहा वाजेच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पोलिंग बुथ मतदारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले.

11 आदर्श मतदान केंद्रे : मतदारांना सेल्फिची भुरळ
भुसावळ मतदारसंघात 316 मतदान केंद्रांपैकी 11 मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्र जाहीर करण्यात आली होती. त्यातील तीन मतदान केंद्रे ही महिला अधिकारी, कर्मचारी यांनीच चालवली. त्यातील कोटेचा महाविद्यालय, एन.के.नारखेडे पत्री शाळा व गोजोरे येथील जिल्हा परिषद शाळेत महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी पु.गं.बर्‍हाटे व पालिकेची शाळा नंबर 35 ही स्वतंत्र केंद्रे होती तर 25 वयोगटाच्या आतील अधिकारी असलेले युवा मतदान केंद्र म्हणून के.नारखेडे विद्यालयात ठेवण्यात आले होते तसेच ग्रामीण भागातील भानखेडा जिल्हा परिषद शाळा, जाडगाव, टहाकळी, किन्ही व आदर्श हायस्कूल भुसावळ हे आदर्श केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली होती. वरील सर्व 11 मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फि पॉईंटची उभारणी करण्यात आल्याने मतदारांसह नवमतदारांसाठी ही बाब हर्षदायी ठरली. अनेकांनी आपल्या कुटुंबासोबत तसेच स्वतंत्रपणे हक्क बजावल्यानंतर त्याच्या आठवणी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केल्या तर सोशल मिडीयातून या सेल्फी टाकण्यात आल्याचे दिसून आले.

मतदार यादीत नावे न सापडल्याने मतदार माघारी
दरवर्षाप्रमाणे यंदाही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत न सापडल्याने मतदारांना आल्या आपली माघारी फिरावे लागले तर अनेक भागातील बीएलओ यांच्याकडून मतदारांना स्लीप वाटप झाल्या नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. निवडणूक विभागाकडून मतदारांच्या घरांपर्यंत स्लीप पोहोचवण्याचे आदेश बीएलओ यांना देण्यात आले असलेतरी अनेक भागातील बीएलओ यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मतदार यावेळी करताना दिसून आले. विशेष म्हणजे खडका भागात याबाबत मतदारांकडून तोंडी तक्रारी करण्यात आल्या. प्रशासनाने कृष्णधवल फोटो व ब्लर फोटो बदलण्याचे आवाहन मतदारांना केले मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने ही नावे डिलिट केली तर मयत व स्थलांतरीतांची नावे हटवल्याचे तहसीलदार निता लबडे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !