भुसावळच्या नगरसेवकांनी घेतला ईडीच्या कारवाईचा धसका
पालिकेतील अपहार प्रकरणी जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कागदपत्रे ताब्यात
भुसावळ- भुसावळ पालिकेतील विविध नऊ प्रकरणाबाबत गुन्हे दाखल झाल्यानंतर जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर तीन कर्मचार्यांनी मंगळवारी पालिकेत येवून गुन्ह्यांमध्ये तपासासाठी आवश्यक विविध विषयांची महत्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर भुसावळात ईडीचे पथक आल्याची अफवा नगरसेवकांमध्ये पसरल्याने राजकीच वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. सायंकाळी मात्र हे पथक जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवकांना हायसे वाटले.
आरोपींना अटक नाही शिवाय शासन निधीची रीकव्हरीही नाही
भुसावळ पालिकेतील घनकचरा प्रकल्पासह, बाजार मक्ता फी, इंग्लिश स्पीकींग क्लास, विविध रस्त्यांचे डांबरीकरण व अन्य नऊ प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भुसावळातील पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील या गुन्ह्यांप्रकरणी तक्रारदार आहेत. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हे गुन्हे सीबीआयकडे वर्ग होण्यासाठी त्यांचा न्यायालयात लढा सुरू आहे तर दुसरीकडे जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत आतापर्यंत अनेक निरीक्षक तसेच उपअधीक्षकांची बदल्या झाल्याने गुन्ह्यांचा पाहिजे त्या वेगवान पद्धत्तीने तपास न होता संथगतीने सुरू आहे तर तीन प्रकरणांमध्ये हा गुन्हाच नसल्याचा अहवालदेखील खंडपीठात प्रतिज्ञा पत्राद्वारे सादर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात एकाही नगसेवकाला अटक व शासन निधीची रीकव्हरी झाली नसल्याने आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणांमध्ये गांभीर्याने लक्ष घालावे, अशी आर्त हाक सुज्ञ भुसावळकर देत आहेत.