यावलकर खंडित वीजपुरवठ्याने संतप्त


वीज महावितरण कंपनीने समस्या सोडवण्याची अपेक्षा

यावल : कोरोनाच्या महामारीत आणि संकटात दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे यावल शहरातील वीजपुरवठा दररोज वारंवार सतत एक-दोन, दोन तासानंतर खंडित होत असल्याने संपूर्ण यावल शहरात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याकडे यावल शहरातील विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी सुद्धा गप्प असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

खंडित वीजपुरवठ्याने मनस्ताप
वीज वितरण कंपनीमार्फत गेल्या महिनाभरात पावसाळ्यात वादळ वार्‍यामध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून ट्री कटिंग करण्यात आले तसेच यावल शहरात आतापर्यंत वारा, वादळ, पाऊस जोरात झालेला नसतानाही कमी प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होता बरोबर वीजपुरवठा तात्काळ खंडित केला जातो. यावल शहरात मुख्य रस्त्यावर म्हसोबा देवस्थानाजवळील इलेक्ट्रिक डीपीवर पुरवठ्याचा वाजवीपेक्षा जास्त विजेचा भार/किंवा वीज वापर जास्त होत असल्याने त्या परीसरासह मेन रोडवर तसेच देशमुखवाड्यात गवत बाजार परीसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीने म्हसोबा देवस्थानाजवळील डीपी बदलवून जास्त क्षमतेची डीपी तत्काळ बसवावी, अशी अशी मागणी या संपूर्ण परीसरातून होत आहे.

पूर्वसूचना न देताच वीज होते गुल
गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण यावल शहरात एक-दोन तासानंतर वीजपुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण यावल शहरातील नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनी वीजपुरवठा खंडित का करते ? कोरोना विषाणूच्या संचार बंदीमुळे 75 टक्के नागरीक आणि व्यावसायीक आपापल्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी थांबून राहत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे यावल शहरातील विविध सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वीज वितरण कंपनी स्थानिक अधिकार्‍यांची समन्वय साधून वीजपुरवठा कायम सुरु राहणे संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !