बोदवडमध्ये कब्रस्तान विकास निधीला आमदारांच्या प्रयत्नांनी मुदतवाढ
बोदवड : शहरातील मुस्लिम कब्रस्तान सुशोभीकरण करणं व विकास कामासाठी 2019 ते 2020 मार्चअखेर आमदार निधीमधून चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र सत्ताधार्यांच्या दुर्लक्षामुळे 31 मार्च रोजी मुदत संपल्यामुळे हा निधी परत गेल्यानंतर बोदवड येथील मुस्लिम कमिटीच्या अध्यक्ष हाजी युनूस बागवान, उपाध्यक्ष बिस्मिल्ला कुरेशी, सचिव बशीर खान, खजिनदार सलामुद्दीन शेख आदींनी ही बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापुढे मांडत या निधीला मुदतवाढ मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानुसार आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याने या कब्रस्तान सुशोभीकरण व विकासासाठी 40 लाखांचा निधी परत मिळाला असून त्यास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता निधीस मुदत वाढ मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर लवकरात-लवकर कामास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

