आठ पोलिसांचं हत्याकांड : गँगस्टर विकास दुबेला अटक
लखनऊ : आठ पोलीस कर्मचार्यांचं हत्याकांड घडवणार्या कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्री गंज पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला कसा पोहोचला? याबद्दलची चौकशी सुरू आहे. विकासच्या अटकेसाठी पोलीस सक्रिय असताना, त्याला राज्याबाहेर जाण्यास कोणी मदत केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर असलेल्या विकास दुबेला मध्य प्रदेशातल्या महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आलं. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी विकासला पकडल्याचं वृत्त एबीपी न्यूजनं दिलं आहे. विकासला पाहताच सुरक्षा रक्षक सतर्क झाले होते. त्यांनी विकासला पकडून याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.
आरोपीचे तीन साथीदार ठार
काही ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये तो दिसला होता. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला. अखेर आज सकाळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याआधी पोलिसांनी विकासच्या साथीदारांना एन्काऊंटरमध्ये ठार केलं. विकासचे साथीदार रणबीर शुक्ला आणि प्रभात मिश्रा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याचं वृत्त आहे.

