यावलमध्ये 23 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
यावल : शहरातील विरार नगगरातील रहिवासी साजियाबी इरफान पटेल (23) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकलेले नाही. विवाहिता घरी एकटीच असताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले तर मृत विवाहितेच्या सासू दवाखान्यातून परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसल्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता विवाहितेने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. मृत विवाहितेच्या पश्चात अडीच वर्षांची मुलगी व आठ महिन्यांचा मुलगा आहे. इरफान पटेल यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहालेे, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

